नटसम्राट



अलीकडेचं नाना पाटेकरांच्या सुरेख,कसदार अभिनयानं  गाजलेल्या या चित्रपटाची प्रशंसा करावी तितकीच कमी.माणूसकीच्या सुपीक जमिनीवर संवेदनशीलतेचं पीक करपण्याचं जे वास्तव ह्या चित्रपटाद्वारे दृष्टिक्षेपातं आणून देण्यात आलं आहे ते प्रशंसनीय आहे.खरतरं, रंगमंच गाजविलेला तो अनभिषिक्त सम्राट असो किंवा एका कमाईवर कुटूंबाची जबाबदारी पेलणारा तुमच्या आमच्यापैंकी एक सामान्य माणूस असो, मग तो रोजंदारीवर जाणारा साधा श्रमजीवी असो, किंवा सियाचीनमध्ये डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करणारा भारतीय जवान असो ;
नटसम्राट ही एका चौकटीत बसणारी उपाधी नव्हे.आपल्या अवतीभोवती असे अनेक नटं आहेत, जे जीवननौका वल्हवत असतांना , वादळांची तमा न बाळगता, किनार्याकडे सावकाश कूच करित असतात.
कारण त्यांना काळजी असते त्यांच्या पिल्लांची. चातकपक्षी ज्याप्रमाणे मृगनक्षत्राची आतुरतेने वाट पाहत असतो त्याचप्रमाणे असा हा नट त्यांना भेटून बिलगण्यासाठी कासाविस होतो.आयुष्यभर असे हे नट त्यांच्या मुलांसाठी खस्ता खातात, त्यांचे स्वःतचे आयुष्य जगून झालेले असते पण त्यांच्या मुलांचे फुललेले आयुष्य बघण्यासाठी ते वाट पाहत असतात.आणि मग अचानक होत्याचे नव्हते होते, मुलांवर टाकलेल्या विश्वासाचा ; घात कधी होतो हे कळत सुद्धा नाही
कधी वृद्धाश्रमात भेट द्या, तिथे तुम्हाला स्वःतचे पात्र हातोटीनं साकारलेले , आयुष्याचा रंगमंच गाजविलेले अनेक नटसम्राट भेटतील, त्यांना विचारा तुमचा मुलगा मुलगी काय करतो ? तिथे तुम्हाला डाॅक्टर,इंजिनिअर असं हमखासं उत्तर मिळणारं, कुणी परदेशात तर कुणाला गलेलठ्ठ पगाराची नोकरी !
घरोघरी मातीच्या चुली ! हल्ली इमारतीच्या उंची वाढल्या पण माणसं मात्र मनानं खुजी झालीत ही वस्तुस्थिती आहे. शिक्षण वाघिणीचे दुध आहे असं म्हणतातं पण हेच दुध प्यायल्यावर माणूस जरं स्वःतच्या पालकांच्या अपेक्षांची शिकार करायला निघाला तर यापेक्षा दुसरे दुर्देव तरी दुसरे नाही.
अडाणी संतती कधीही आई वडिलांना तिथे पाठवत नाही. उच्चविद्याविभूषित आणि मूल्याधिष्ठीत मधील हीच दरी आज समाजमनं सुन्न करते.
पोटच्या लेकरांच्या प्रेमासाठी आसुसलेलं ते जोडपं मगं उर्वरित आयुष्य बाबा आमटेंनी सांगितल्याप्रमाणे खालील ओळींना न्याय देत जगत असतं
"श्रृंखला पायी असू दे
मी गतीचे गीत गायी
दुःख उधळवयास आता आसवांना वेळ नाही"

प्रेम- सूर्याला प्रकाश द्यायला, त्रृतूंना बदलायला, कळ्यांना फुलायला शिकवतं.पण नटसम्राटाला निस्वार्थ प्रेम अनुभवायला क्वचितचं मिळतं. तुम्हाला ठाऊक आहे काय ? कदाचित अनुभवातून जाणं तुमच्या प्राक्तनात असेल , त्याचा स्वीकार करणे अपरिहार्य ! पण प्रगतीच्या  लाटेंवर स्वार होत असतांना मात्र पालकांच्या अपेक्षेची नाव बुडणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
म्हातारपण हे दुसरं बालपणं असतं, इंग्रजीतलं एक वाक्य आहे, The wheel of the time moves indiscriminantly.वेळेचं चक्र कसलाहि भेदभाव न करता फिरत असतं. म्हातारपणं हे लादलं जात नाही तर निसर्गनियमानुसार ते येणं, स्विकारणं आणि जगणं क्रमप्राप्त आहे.
कालांतराने तुम्हीसुद्धा नामशेष होणार आहातं, काही माणसं अश्या अर्विभावात जगत असतात जणू काही समूद्रमंथनातून त्यांना अमृत प्राप्त झाले आहे.प्रेतयात्रेला बघून सिद्धार्थाला जीवनाचे खरे गांभीर्य समजले तर, रावण हा सर्वात विद्वान ब्राम्हण असूनसुद्धा विवेकहीनतेमुळे स्वःतच्या विनाशास कारणीभूत ठरला !
मृत्युच्या पाशात फसण्यापूर्वी, अहंकाराचे, मी पणाचे आभूषणं गळून पडायला हवीत.आणि रंगमंच गाजविलेल्या आपल्या नटसम्राटास योग्य मानमरातब मिळवून देणेही तितकचं महत्वाचं.

"मी पण ज्यांचे पक्व फळापरि,
सहजपणाने गळले हो,
जीवन त्यांना कळले हो"


Comments

Popular Posts